शनिवार, २९ ऑगस्ट, २००९

'अपडेटेड' सॉफ्टवेअर!

'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले, तरी ते मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार? त्याचा वेध...
....

आपण बऱ्याच वेळेला नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो. बऱ्याचजणांना तो छंदच असतो. ते सॉफ्टवेअर आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का, ते आपल्या मशीनच्या प्रकृतीला मानवणारे आहे का याचा फारसा कोणी विचार करत नाही. जर मशीनला ते झेपणारे नसेल तर तशी स्पष्ट सूचना मिळते. मग ते डाऊनलोड करण्याचा हट्ट सोडायला हवा. सगळे ते 'लेटेस्ट' हवे असणाऱ्यांसाठी नेटवर काही टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे ते या सॉफ्टवेअरमुळे सांगता येते. तुम्ही 'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले असले तरी ते फक्त मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार?

त्यासाठी तुम्ही नेटवर जा. filehippo.com ही साइट ओपन करा. तिथे सध्या 'अपडेट चेकर व्हर्जन १.०३२' उपलब्ध आहे. ती केवळ १५४ केबीची असल्याने घरी ब्रॉडबँड नसणाऱ्यांनाही पटकन डाऊनलोड करता येईल. डेस्कटॉपवर सेव्ह करा आणि नंतर त्यावर डबलक्लिक करून ती 'रन' करा. काही सेकंदांतच तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर आऊटडेटेड झाले आहे त्याची लिस्टच स्क्रीनवर दिसेल. त्यातील कोणते अपडेट्स डाऊनलोड करायचे हे मात्र तुम्हालाच ठरवायला लागेल. Updastar हे आणखी एक असेच सॉफ्टवेअर. ते फाइलहिप्पोपेक्षा अधिक परिणामकारक आहे असे म्हणतात. त्यात मशीनमधले प्रत्येक सॉफ्टवेअर तपासले जाते व त्याचा रिपोर्ट मिळतो. त्याची महागडी व्हर्जन अधिक प्रभावी आहे. फुकटातली व्हर्जन आपल्याला पुरेशी आहे.

फायरफॉक्स या ताज्या दमाच्या ब्राऊझरमध्ये 'सॉफ्टवेअर अपडेट चेकर १.३' अशी सुविधा होती. परंतु, दहा दिवसांपूवीर् फायरफॉक्स व्हर्जन ३.५ उपलब्ध झाल्यानंतर हा प्रोग्राम उपयोगी ठरत नाही. तिथे हा चेकर डाऊनलोड करायला गेल्यावर 'हा प्रोग्राम फायरफॉक्सच्या जुन्या व्हर्जनलाच उपयोगी पडतो', असा मेसेज येतो आणि निराशा होते. फायरफॉक्सचा धडाका पाहता हा चेकर पुन्हा आपल्या मदतीला धावून येईल यात शंका नाही.

sumo म्हणजेच 'सॉफ्टवेअर अपडेट मॉनिटर' हेही चांगले आहे. याचे वैशिष्ट्य असे की नेमकी कोणत्या प्रकारची सॉफ्टवेअर तुम्हाला चेक करायची आहेत तेवढेच चेक करण्याची सुविधा आहे. त्यातून वेळ वाचतो आणि भरमसाठ प्रमाणात सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचा मोहही वाचतो. याचा फाइलसाइझ दीड एमबी आहे. Securial psi हे सॉफ्टवेअर उपयुक्त असल्याचे शेरेही इंटरनेटवर वाचायला मिळतात. यातील पीएसआय म्हणजे 'पर्सनल सॉफ्टवेअर इन्स्पेक्टर'. नवीन सॉफ्टवेअरबरोबरच तुमचे मशीन सुरक्षित ठेवण्याचेही काम तो करतो, असा दावा त्यांनी केला आहे. appupdater किंवा radarsinc ही आणखी काही सॉफ्टवेअर अपडेटर आहेत. मी ही वापरलेली नाहीत. कारण मला फाइलहिप्पो हे एकच सॉफ्टवेअर पुरेसे वाटते.

सध्या फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर वगैरेच्या माध्यमातून सोशल नेटवकिर्ंग करण्याचे फॅड असल्याचे ओळखून फायरफॉक्सने 'अॅडऑन' म्हणून दहा अशा साइट्सची सोय केली आहे. फायरफॉक्स ओपन केल्यावर टूल्सवर क्लिक करा व नंतर अॅडऑनवर जा. तिथे आवश्यक ते अॅडऑन लोड करून घ्या. अलीकडे कम्प्युटरविषयक बऱ्याच मासिकांच्या साइटवरून नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची सोय आहे. उदा. download.chip.asia/in या साइटवर हे फायरफॉक्सचे अॅडऑन पटकन मिळतील. त्याचबरोबर अन्य असंख्य सॉफ्टवेअर मिळतील. या काही मासिकांच्या किमती शंभर ते दोनश्ेा रुपयांपर्यंत असतात. ते प्रत्येलाच परवडेल असे नाही. मग अशा वेबसाइट फायदेशीर ठरतात. अन्यथा नुसत्या Download.com या साइटवर जा. CNET.com ही आणखी एक उपयुक्त साइट. तिथे मोबाइल, लॅपटॉपपासून सगळ्या उपकरणांसाठी लागणारी माहिती मिळेल.

प्रत्येक सॉफ्टवेअर अपडेट होत असतेच आणि प्रतिर्स्पध्यासमोर नवनवीन आव्हाने उभी होतात। 'गूगल'ने 'क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम' आणण्याचा निर्णय घेतला तोही याच कारणाने. मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आणली. त्यानंतर अलीकडेच 'इंटेल'ने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचा निर्णय घेतला होता. विंडोजमध्ये एक्सपी, व्हिस्ता आणि लवकरच 'विंडोज ७' येत आहे. पण वेगाच्या जमान्यात ग्राहकांना आणखी वेगवान व सुटसुटीत ऑपरेटिंग सिस्टिमची गरज वाटत होती. ती गूगल पूर्ण करील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. मात्र त्यासाठी वर्षभर वाट पाहायची तयारी हवी. कारण सुरुवातीला ती प्रणाली फक्त 'नोटबुक'मध्येच घालण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या घरच्या पीसीमध्ये ही सिस्टिम बसवता येईल. तोपर्यंत 'वेट अँड वॉच'...
- अशोक पानवलकर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4786918.cms

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा