बुधवार, ८ जुलै, २००९

उत्तम वेब साईटस..

http://www.rarebookroom.org/

एक शैक्षणिक साईट. ओक्टाव्हो ह्या कंपनीने जगभरातील दुर्मिळ पुस्तकांचा मागोवा घेतला आणि त्या पुस्तकातील प्रत्येक पानाचे छायाचित्र घेतले. ही छायाचित्रे अत्यंत हाय रिझोल्युशनची आहेत. एका पानाचा आकार २०० एम.बी. पर्यंत गेल्याची माहिती ही साईट पुरवते. १४५५ साली गटेनबर्गने छापलेलं बायबल आपल्याला इथे पहायला मिळतं. गॅलिलीओ, केप्लर, आईनस्टाईन, न्युटन, कोपर्निकस, डार्विन वगैरे शास्त्रज्ञांची पुस्तके इथे आहेत. लक्षात घ्या की ही प्रत्यक्ष पुस्तकाची (पानापानांची) छायाचित्रे आहेत. दुर्मिळ पुस्तक प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद इथे मिळतो.

http://www.kosmix.com/

हे खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन आहे. अत्यंत उपयुक्तही आहे. गुगलच्या प्रचंड ढिगार्‍यातून टाचणी शोधत बसण्यापेक्षा इथे जावं. हवी ती टाचणी पटकन मिळण्याची शक्यता इथे जास्त. Auto, Travel, Health, Finance, Politics आणि Video Games हे विभाग इथे आहेत. ह्या विभागाच्या अंतर्गत माहितीची मांडणी नेटकेपणाने करण्यांत आली असल्याने हे त्या विशिष्ट विषयांचे अत्यंत सोयीस्कर असे सर्च इंजिन बनले आहे.

http://www.topix.net/

बातम्या पटापट शोधून देणारं हेही एक सर्च इंजिनच. बातम्यांना वाहिलेलं आणि भौगोलिक दृष्ट्या बातम्यांचा शोध उत्तमरित्या घेण्याची सोय इथे आहे.
पौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश. Encyclopedia Mythica म्हणून त्याचे इंटरनेटवरील स्थान अद्वितीय आहे. ७००० हून अधिक लेख ह्या ज्ञानकोशात असल्याचा ह्या साईटचा दावा आहे. हिंदू पौराणिक विभागात ३३० लेख आहेत. त्याची लिंक http://www.pantheon.org/areas/mythology/asia/hindu/articles.html ही आहे. कायम बुकमार्क करावी अशी ही साईट आहे.

http://sanskritdocuments.org/marathi/

एका मोठ्या साईटचा हा महत्वपूर्ण विभाग. मराठी भाषेतील पुस्तके आणि इतर साहित्याचा. संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण दासबोध, हरिपाठ, मनाचे श्लोक ह्या धार्मिक ग्रंथांव्यतिरिक्त मराठीशी संबंधित अनेक उपयुक्त लिंक्स इथे आहेत. मूळ sanskritdocuments.org ही साईट तर प्रचंड संदर्भ साहित्याने भरलेली आहे. आपल्या यादीत ह्या साईटस हव्यातच.

http://mr.wikipedia.org/wiki/

सर्वांना माहीत असलेली आणि कदाचित सर्वजण कधी ना कधी तिथे गेले आहेत अशी ही मराठी विकीपेडियाची साईट. ज्यांनी इथे भेट दिलेली नाही त्यांनी ताबडतोब तिथे जावे. १०००० हून अधिक मराठी लेख असलेला हा जगाचा, जगाने जगासाठी तयार केलेला ज्ञानकोश आहे.


http://www.urbanfonts.com

अप्रतिम आणि विविध विषयांवरचे Dingbat Fonts (मोफत अर्थातच) हे ह्या साईटचे वैशिष्ट्य. इतर उत्तम फॉंटसचा खजिनाही सोबत आहेच. फॉंटप्रेमींना प्रभावित करेल अशी साईट.

http://www.sxc.hu/

हंगेरी देशातली साईट. २,५०,००० हून अधिक मोफत (आणि उत्तम दर्जाची) छायाचित्रे डाऊनलोडींग साठी देणारी. अतिशय High Resolution असलेली ही छायाचित्रे खरोखरीच प्रेक्षणीय आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रांचे वर्गीकरण करण्यांत आले आहे. मोफत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असले तरी त्याचे चीज करणारी ही साईट आहे.

http://www.webmd.com/

रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना उपयोगी पडेल अशी माहिती देणारी ही साईट. विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या (A ते Z याप्रमाणे अक्षरशः शेकड्याच्या संख्येने), अलर्जीपासून ते योगा आणि एक्स-रे पर्यंत माहितीचा खजिना इथे आहे.

http://www.librarything.com/

एक जबरदस्त उपयुक्त साईट. Web 2.0 ची झलक दाखवणारी. Catalogue your books online असे ब्रीदवाक्य आपल्या पहिल्या पानावर मिरवणारी. आपल्या घरातील पुस्तकांची यादी ह्या साईटवर ठेवता येते. लेखक, नाव, प्रकार वगैरे निकषांवरून पुस्तकांचा त्वरित शोध घेण्याची सोय अर्थातच आहे. युनिकोड कॉंप्लायंट असल्याने मराठी पुस्तकांची यादी आणि त्यांचा शोधही इथे शक्य होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे भाषांच्या यादीत 'मराठी' चा समावेशही आहे.

http://www.instructables.com/

स्वतःचे केस कसे कापावेत पासून ते आपल्या LCD मॉनिटरचा उपयोग टीव्ही सेट म्हणून कसा करावा इथपर्यंत अक्षरशः शेकडो कृतींचा ज्ञानकोश म्हणजे ही साईट. प्रत्यक्ष पाहणं ही एक कृती आपण केली की ही साईट आपल्यापुढे घरगुती कृतींपासून ते कॉंप्युटर टेक्नॉलॉजीपर्यंत सारं काही 'प्रॅक्टीकली' पेश करते.

http://www.webdesignfromscratch.com/

वेब डिझायनर्ससाठी कायम संदर्भाची साईट. तसेच ज्यांना वेब डिझायनिंग अगदी पहिल्यापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठीही ही उत्तम सोय आहे. Web 2.0 सह खूपच महत्वाची आणि अद्यावत माहिती देणारी ही साईट अतिशय विश्वासार्ह मानली जाते.

http://www.space.com/scienceastronomy/101_earth_facts_030722-1.html

अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची. फक्त १०१ प्रश्नांच्या उत्तरातून अफाट ब्रम्हांड उलगडून दाखवलय. काही प्रश्नांची उत्तरे डोकं चक्रावून टाकणारी आहेत. हे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहा-
जगातील सर्वांत कोरडी जागा कोणती?
- चिली देशातील अरिका प्रांतात दरवर्षी ०.०३ इंच पाऊस पडतो. ह्या पावसाच्या पाण्याने कॉफीचा कप भरायला ठेवला तर शंभर वर्षे लागतील.
जगातील सर्वांत ओली जागा कोणती?
-कोलंबियातील लोरो प्रांतात ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो. २६ जुलै रोजी मुंबईत जो प्रचंड पाऊस झाला त्यावेळी सांताक्रुझ वेधशाळेने २४ तासात प्रचंड म्हणजे ३७ इंच पाऊस झाल्याची नोंद केली होती.
हे आणि असे आणखी ९९ प्रश्न व त्यांची उत्तरे ह्या साईटवर वाचा.

इंटरनेटवर मराठी ते इंग्रजी ऑनलाईन देणारी डिक्शनरी

http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/

जगभरातील सर्व सत्ताधीशांचे तयार (आणि अद्ययावत) संदर्भ
rulers.org ही वेबसाईट म्हणजे राजकीय संदर्भांच्या दृष्टीने एक खजिना आहे. ताजी बातमी म्हणजे, उत्तर प्रदेशात मायावती मुख्यमंत्री झाल्या त्या चार दिवसांपूर्वी. पण ती नोंदही rulers.org ने घेऊन ठेवली आहे. थोडक्यात काय, तर rulers.org ही सातत्याने आणि त्वरेने अपडेट होणारी वेबसाईट आहे.
ह्या साईटवर जगातल्या सर्व देशांच्या सत्ताधीशांची अशा प्रकारे अद्ययावत माहिती
मोफत उपलब्ध आहे. सातत्याने अपडेट केली जात असल्याने ह्या साईटचे महत्व
एखाद्या ज्ञानकोशासारखे आहे.
१९९६ ते आज २००७ म्हणजे गेल्या संपूर्ण दशकाच्या जागतिक राजकीय इतिहासाचा
लेखाजोखा इथे उपलब्ध आहे. उदाहरणार्थ १७ जुलै १९९६ ची ही नोंद पहाः
ज्या १७ जुलै १९९६ ह्या तारखेस पी.सी. अलेक्झांडर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना गोव्याचे राज्यपालपद ग्रहण केले त्याच दिवशी रशियात अध्यक्षपदी असलेल्या बोरिस येल्तसिन यांनी ऐगोर रोडिनोव यांना रशियाचे संरक्षणमंत्रीपद दिले.
सांगायची गोष्ट म्हणजे, १९९६ ते २००७ चा हा मे महिना ह्या दरम्यानच्या प्रत्येक तारखेच्या जागतिक राजकारणातील सत्तेसंबंधीच्या घडामोडी ह्या साईटने नोंदवलेल्या आहेत. छायचित्रेही फार मोठ्या प्रमाणावर आहेत. जगातल्या २५० हून अधिक देशांतील सर्व राज्ये व इलाक्यांतील सत्तेच्या नोंदी सातत्याने अद्यावत राखणारी ही वेबसाईट मुख्यत्वे देणग्यांवर चालते.


http://www.sosmath.com/tables/tables.html

गणित विषयक एक चांगली साईट. लॉगॅरिथमपासून ते ट्रिगॉनॉमेट्रिकल आयडेंटीटी पर्यंत अनेक कोष्टके इथे उपलब्ध करण्यांत आली आहेत. ती एक्सेल फाईल म्हणूनही तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.


http://www.whimsy.org.uk/superstitions.html

अंधश्रद्धांची लांबलचक आणि अत्यंत मनोरंजक यादी. मोराचं पिस घरात लावणं म्हणे अशुभ असतं, तर हंसाचं पिस नवर्‍याच्या उशीत लावल्यास तो पत्नीशी एकनिष्ठ राहतो, वगैरे वगैरे. धमाल आहे.

-माधव शिरवळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा