गुरुवार, ९ जुलै, २००९

एका क्लिकसरशी... ई-लर्निंग

जगप्रसिध्द मॅनेजमेण्ट गुरूंकडून मॅनेजमेण्टचे फण्डे घरबसल्या शिकणं शक्य आहे का? आपल्याला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग आठवेनासं झालं, तर कपाटातली डिक्शनरी न काढता कुणी मदतीला येईल का? तुम्ही व्हर्चुअल क्लासरुमचे विद्यार्थी झालात, तर या सगळ्या गोष्टी एका क्लीकसरशी साध्य होतात. आता कम्प्युटर घरोघरी आलेत आणि इंटरनेटही. त्यामुळेच ई-लर्निंगचा फायदाही तुम्ही जाणून घ्यायलाच हवा.

वाचता वाचता एखादा इंग्रजी शब्द खड्यासारखा टोचला तर काय कराल? फारतर तो शब्द (खडा) गिळाल किंवा त्याचा अर्थ धुंडाळण्यासाठी डिक्शनरी शोधाल. डिक्शनरी नाहीच मिळाली तर काय? सरळ तुमचा पीसी ऑन करा... आणि त्याच्याशी शेपूट जोडून बसलेल्या माऊसचा ताबा घ्या... इंटनेटवर गुगलवर 'टोचलेल्या' शब्दाच्या अर्थासह तो वाक्यात योग्य पद्धतीने कसा वापरायचा याच्या व्याकरणासह टीप्स देणाऱ्या हजारो साईट्स तुमच्या स्क्रीनवर वाहू लागतील... केवळ डिक्शनरीच नव्हे तर तुमच्या आवडीच्या एक्सपर्ट प्रोफेसर्सची लाईव्ह लेक्चर्स पाहण्याची, त्यातून शिकण्याची ताकद त्या इवल्याश्या माऊसने कमावली आहे. ही ताकद सामावली आहे ती 'ई-लर्निंग' या छोट्याश्या शब्दांत!

ई-लर्निंग (इलेक्ट्रॉनिक लर्निंग) म्हणजे कम्प्युटर आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्हिडिओ स्क्रीन कॅप्चर, एमपी थ्री प्लेअर, वेबसाईट्स अशा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साह्याने शिक्षण घेणं! डिस्टन्स लर्निंग, व्हर्चुअल क्लासेस हा ई-लनिर्ंगचाच एक भाग! ई-लर्निंगची आंतराष्ट्रीय बाजारपेठ २००८मध्ये २१ बिलियन डॉलरची असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

इंजिनीअरिंग, मेडिकल, लॉ या क्षेत्रात भासणाऱ्या दर्जेदार शिक्षकांच्या कमतरतेवरही ई-लर्निंग हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं महाराष्ट्र नॉलेज कॉपोर्रेशनचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांना वाटतं. आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थाही या प्रश्नापासून दूर नाहीत. एका शिक्षणसंस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा इतर संस्थांतील विद्यार्थ्यांनाही व्हावा, या दृष्टीने 'व्हर्चुअल क्लासेस' ही संकल्पना आता कुठं रुजू लागली आहे..

आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रात चांगलीच आघाडी घेतली आहे. एज्युसॅटच्या माध्यमातून आयआयटीतील शिक्षकांची व्हिडिओ चित्रिकरण केलेली लेक्चर्स पाहण्याची संधी इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांना मिळते. मुंबईसह सातही आयआयटीजमध्ये त्यासाठी अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात केवळ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे इथेच आयआयटीच्या शिक्षकांचं लाईव्ह स्क्रीनिंग पाहता येतं. याच प्रकारची सुविधा 'मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (एमआयटी) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंस्थेने उपलब्ध करून दिली आहे. एमआयटीच्याच वेबसाईटवर देशभरातील आयआयटीसारख्या दजेर्दार शिक्षणसंस्थांच्या ऑनलाइन लेक्चर्सच्या लिंकेजेसही उपलब्ध आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटतर्फे (आयसीएआय) डिजिटल फॉरमॅट आणि र्व्हच्युअल क्लासेसच्या माध्यमातून ई-लर्निंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. तर कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांकरिता eshikshaindia.in पोर्टल सुरू केलंय. १२ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील कठीण प्रश्नांची उत्तरं मल्टिमीडिया, व्हॉईस ओव्हर, अॅनिमेशन आणि आलेखांच्या साहाय्याने सोडवण्यास हे पोर्टल मदत करतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, भूगोल या विषयाशी संबंधित शंकांचं समाधान करण्याकरिता या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सेसमध्ये (बिट्स पिलानी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या जातात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकं उपलब्ध करून देऊन बिट्स पिलानीनं मोठीच आघाडी घेतली आहे. केवळ विद्याथीर्च नव्हे तर विप्रोसारख्या कंपन्याही नामवंत शिक्षणसंस्थांशी टायअप करून ई-लर्निंगच्या माध्यमातून आपल्या स्टाफच्या कण्टिन्युइंग एज्युकेशनसाठी प्रयत्न करत आहेत.

अजून तरी भारताचा ई-लर्निंगमधील सहभाग फारच नगण्य आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील शिक्षणसंस्था ई-लनिर्ंगच्या क्षेत्रात अजूनही बाल्यावस्थेतच आहे. विद्यार्थ्यांना आथिर्क मोबदल्यात ऑनलाईन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणा-या खासगी कंपन्या तशा प्रचंड आहेत. पण, यात शिक्षणसंस्थांचा सहभाग अत्यंत मर्यादित म्हणता येईल.

मॅकॅन्सी-नॅसकॉमच्या अहवालानुसार भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २३ टक्के विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन घेत आहेत. परंतु आताच्या घडीला काही ठराविकच शिक्षणसंस्था कम्प्युटर किंवा इंटरनेटचा डिस्टन्स लनिर्ंगसाठी वापर करताहेत. डिस्टन्स एज्युकेशन घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या २०१० पर्यंत ४० टक्क्यांवर नेण्याची केंद सरकारची योजना आहे. डिस्टन्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बहुतांशी नोकरी करता करता शिक्षण घेणारे असतात. म्हणूनच, कमी पैशात घरच्या घरी कम्प्युटरवर शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रातील आपला सहभाग वाढवण्याची गरज आहे. लवकरच हे चित्र पालटेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय. dmoz.org/reference/education/distance-learning, dmoz.org/reference/education/instructional-techonology

या वेबसाईटवर डिस्टन्ट लर्निंग घेऊ इच्छिणा - या विद्यार्थ्यांकरिता माहितीचा खजिनाच आढळतो. ज्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिकण्याची वा आपल्या माहिती-ज्ञानाचा विस्तार करायची इच्छा आहे, त्यांच्याकरिता काही उपयुक्त वेब-साईट्स...

१) e-learningcenter.com

२) virtualstudies.net

ई - लर्निंगचे फायदे

१)ऑनलाईन डिक्शनरी, इंग्रजी व्याकरण या विषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सुविधा कमी वेळेत वापरणं शक्य होत असल्याने संपर्काची भाषा सुधारते.

२)सादरीकरणाच्या पारंपरिक 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' (फळा आणि खडू) साधनांऐवजी अत्याधुनिक तंत्रं वापरता येतात. उदा. पॉवरपाईंट प्रेझेन्टेशन, ग्राफिक्स, डिझाईन्स, ऑडिओ-व्हिडिओचा वापर यामुळे विषय समजणं सोपं होतं.

३)इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे वेळ वाचतो. एका क्लिकच्या झटक्यात माहितीचा खजिना उलगडतो.

४)जगातील कुठल्याही भागातून शिक्षक वा तज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाण-घेवाण करता येते.

५)केवळ विद्याथीर्च नव्हे तर मेडिकल, इंजिनीअरिंग आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनाही ई-लनिर्ंगद्वारे निरंतर शिक्षण (कण्टिन्युइंग एज्युकेशन) घेऊन आपल्या ज्ञानाचं अपडेटिंग करता येणं शक्य आहे.

-marathigyaan

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा