बुधवार, ८ जुलै, २००९

मराठी फाँट

मराठी फाँटस् विकत घ्यावे लागतात, ते ५०००/- ते ३०,००० रूपयांपर्यंतच्या किंमतीचे असल्याने खिशाला भगदाड पाडणारे असतात. त्यामुळे ते विकत घेण्यापेक्षा पायरेटेड कॉपी मिळवण्याची धडपड ही केव्हाही चातुर्याचीच वाटते.
आपल्याकडील मराठी फाँटचे पॅकेज रितसर विकत घेतलेले असो की पायरेटेड असो, आपल्याला त्या पॅकेजमध्ये असलेल्या फाँटमध्येच व्यवहार करता येतो ही मर्यादा आपल्याला कायम भेडसावत असते. म्हणजे, वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आकृतीचे पॅकेज असेल तर आपण आकृती ब्रॅंडपुरतेच मर्यादित असतो. श्रीलिपी ब्रॅंडचा मजकूर आला की आपण गडबडतो. कारण आकृती आणि श्रीलिपी हे दोन्ही मराठी फाँट असले तरी जणू दोन वेगळ्या भाषांतले असावेत इतके भिन्न असतात. अशा वेळी श्रीलिपीचा मजकूर आपल्या आकृती ब्रॅंडच्या फाँटमध्ये रूपांतरित कसा करावा याची समस्या आपल्याला सतावत असते. असं रूपांतरण करणारे सॉफ्टवेअर कुठेतरी उपलब्ध आहे असं आपण ऐकलेलं असतं. पण ते नेमकं कोणतं सॉफ्टवेअर हे माहित नसतं. इंटरनेटवर शोधूनही ते खूपदा सापडत नाही. सारांश आपला गोंधळ कायम असतो.
खरं तर आज मराठीची फाँटची समस्या अधिकृतपणे सुटलेली आहे. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने ती उत्तमरित्या सोडवली आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण असण्याची काहीही आवश्यकता नाही.
आज कोणालाही मराठी फाँट विकत घेण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने उत्तम मराठी फाँट त्यांच्या www.ildc.in ह्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध केले आहेत. ह्या फाँटची चाचणी मी घेतली आहे, आणि गेले काही महिने मी तेच फाँटस माझ्या मराठी टायपिंगसाठी वापरतो आहे. थोडक्यात, आता मराठी फाँटसाठी ५,००० ते ३०,००० टाकण्याची, वा खिशाला भगदाड पाडून घेण्याची कसलीही आवश्यकता नाही. केंद्र सरकारचे हे मराठी फाँटस तुम्हाला दोन प्रकारे मिळू शकतात. एक म्हणजे www.ildc.in ह्या साईटवरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करून घेऊ शकता, आणि दुसरं म्हणजे ह्याच वेबसाईटवर मोफत नोंदणी करून तुम्ही ह्या फाँटची सीडी पोस्टाने मोफत मागवू शकता. पोस्टाने पाठवण्याचा खर्चसुद्धा केंद्र सरकार सोसते
# तुमच्याकडे आकृतीचे फाँटस आहेत व तुम्हाला श्रीलिपी फाँटची फाईल तुमच्या आकृती फाँटमध्ये रूपांतरित करायची आहे तर ते शक्य आहे. केंद्र सरकारने वरील वेबसाईटवर 'परिवर्तन' नावाचे एक सॉफ्टवेअर उपलब्ध केले आहे. ते वापरून तुम्ही दोन वेगवेगळ्या पॅकेजेसमधील फाँटच्या फाईल्स रूपांतरित करू शकता. तुम्ही पोस्टाने जी सीडी मागवता त्यातही हे सॉफ्टवेअर सरकारने दिले आहे.
# केंद्र सरकारने www.ildc.in वर दोन प्रकारचे फाँटस डाऊनलोडींगसाठी ठेवले आहेत. पहिला प्रकार आहे OTF प्रकारचे किंवा Open Type Fonts. हे फाँटस युनिकोड आधारित असल्याने तुम्ही जीमेल, याहू, हॉटमेल वगैरे ईमेल कंपोज करण्यासाठी पाठवू शकता. अशी ईमेल तुम्ही जगात कुठेही आणि कोणालाही पाठवू शकता. ज्याला तुमची ही मराठी ईमेल मिळेल त्याच्याकडे कोणतेही मराठी फाँटस असण्याची आवश्यकता नाही. हे सारे युनिकोडच्या तंत्रामुळे आता शक्य झालेले आहे.
दुसर्‍या प्रकारचे फाँटस केंद्र सरकारने दिले आहेत ते |TTF किंवा True Type Fonts. ह्या फाँटसंचा उपयोग करून तुम्ही Word, Pagemaker, Excel, Wordpad, Indesign, Coreldraw, One Note वगैरेंमध्ये मराठी टायपिंग करू शकता.

टायपिंगसाठी तीन प्रकारचे मराठी कीबोर्डस् दिलेले आहेत. पहिला आहे Inscript. ज्यांना DOE कीबोर्ड वापरण्याची सवय आहे त्यांचेसाठी तो उपयुक्त आहे. दुसरा आहे Typewriter Keyboard. जे मतजल प्रकारचा टाईपरायटर (गोदरेज वा रेमिंग्टन) कीबोर्ड वापरतात त्यांचेसाठी तो उत्तम आहे. तिसरा कीबोर्ड आहे Phonetic. ज्यांना टायपिंग येत नाही त्यांचेसाठी तो आहे. समजा तुम्हाला 'प्रकाश' हे नाव टाईप करायचं असेल तर तुम्ही prakAsh असं इंग्रजीत टाईप करायचं. तुम्हाला मराठीत प्रकाश हा शब्द बिनचूकपणे मिळतो.

तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे OTF चे युनिकोड फाँटस वापरून तुम्ही गुगलमध्ये मराठीत शोध घेऊ शकता. गुगलचा हा मराठी मजकूराचा शोध अत्यंत उपयुक्त आहे. करून पहा.
Font Problem. Click here. असा हात वेबसाईटवर देण्याची आता गरजच लागणार नाही. कारण वेबसाईट जर युनिकोड फाँटसनी केलेली असेल तर जगात कुठेही फाँट नसले तरी मराठी वेबपेजेस उत्तमरित्या दिसतात. ज्यांच्या वेबसाईटस अद्यापि युनिकोड आधारित नाहीत त्यांनी त्या ताबडतोब कराव्यात म्हणजे Font Problem ची समस्या देवीच्या रोगासारखी नष्ट होईल. उद्या Font Problem दाखवा, हजार रूपये मिळवा अशा प्रचार घोषणाही सरकारला करता येणे अशक्य नाही.
-माधव शिरवळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा